MPSC उत्तीर्ण उमेदवारांना टाळेबंदीची शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनामुळे देशात मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू केल्याने शासकीय कार्यालये बंद होती.

MPSC उत्तीर्ण उमेदवारांना टाळेबंदीची शिक्षा
MPSC Exam 2021

MPSC उत्तीर्ण उमेदवारांना टाळेबंदीची शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनामुळे देशात मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू केल्याने  शासकीय कार्यालये बंद होती.

राज्यातील सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क पदाच्या सुरू असलेल्या नियुक्ती प्रक्रियेत खंड पडला. मात्र, आता ‘एमपीएससी’ नियमांकडे बोट दाखवून नियुक्ती प्रक्रिया ठरावीक कालावधी न झाल्याने उर्वरित जागांवर नियुक्ती देण्यास नकार देत आहे.  कुठलाही दोष नसताना केवळ  शासनाच्या  धोरणाची शिक्षा ‘एमपीएससी’सारखी काठिण्य पातळीची परीक्षा उत्तीर्ण झालेले  ४७ उमेदवार भोगत आहेत.(MPSC Exam 2021)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मोटार वाहन निरीक्षक गट-क या पदासाठी ३० जानेवारी २०१७ ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ ला घेण्यात आली. निकाल ९ सप्टेंबर २०१९ ला लागला. एमपीएससीकडून ८३२ उमेदवारांची कागद पडताळणी होऊन सुरुवातीला ६८१ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

त्यानंतर १० जुलै २०२०ला प्रतीक्षा यादी-१ नुसार १०१ उमेदवारांपैकी ७७ उमेदवारांना तर २६ ऑगस्ट २०२०च्या प्रतीक्षा यादी-२ नुसार ३४ पैकी २७ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. तिसरी प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब झाला. त्यानंतर करोनामुळे कडक टाळेबंदी लागली. यादरम्यान उर्वरित ४७ पदांच्या नियुक्तीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र परिवहन विभागाकडून एमपीएससीला पाठवण्यात आले. मात्र, परीक्षेच्या प्रतीक्षा यादीचा कालावधी वाढवण्याची मागणी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या नियमानुसार मान्य करता येणार नाही, असा निर्णय  एमपीएससीने दिला.

परिवहन विभागानेही एमपीएससीच्या या नकारानंतर पुढे कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर परीक्षा उत्तीर्ण होऊनही हे उमेदवार शासनाच्या लालफितशाहीचे बळी पडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


एमपीएससीकडून अंतिम निकाल जाहीर झाल्यावर नियुक्त्यांसाठी कालावधी ठरवून दिला जातो. मात्र, टाळेबंदीमुळे या कालावधीचे पालन करणे परिवहन विभागाला शक्य झाले नाही. नियुक्तीसाठी परिवहन विभाग, एमपीएससी आणि सामान्य प्रशासन विभाग हे नियमावर बोट ठेवत विशिष्ट कालावधीत नियुक्ती न झाल्याचे सांगतात.(MPSC Exam 2021)

त्यामुळे राज्य शासनाने टाळेबंदीमुळे रखडलेल्या नियुक्त्यांसाठी शासनादेश काढावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.