पुण्यात पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला.

पुण्यात पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर
Zika Virus In Pune

पुण्यात पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला.

कोरोनाची लाट ओसरत नाही तेच पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यात एका 50 महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. मात्र, उपचाराअंती ही महिला बरी झाली आहे. अशी माहिती पुणे आरोग्य विभागाने दिली आहे.पुणे जिल्ह्यामधील पुरंदर  तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला.(Zika Virus In Pune)

या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबीयांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.बेलसर गावातील एका 50 वर्षाच्या महिलेस झिका व्हायरस आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलै 2021 रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि  ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या.

झिका विषाणू म्हणजे काय?


झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळं डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.

झिका विषाणू कसा पसरतो?

झिका विषाणू प्रामुख्यानं एडीस डासांच्या प्रजातीमुळं पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांना चावल्यानं विषाणू पसरतो. लैंगिक संबंधांमधूनही हा व्हायरस पसरू शकतो. तसंच, ब्लड ट्रान्सफ्युजनमधूनही झिका व्हायरस पसरण्याची शक्यता असते.

झिका व्हायरसची लक्षणे कोणती?

झिका व्हायरसमुळं ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तर, इतर, रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. डास चावल्यानंतर साधारणतः आठवड्यानंतर झिका व्हायरसची लक्षणे आढळून येतात.

झिका व्हायरसवर उपचार कोणते?


झिका व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाहीये किवां कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात.

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात.(Zika Virus In Pune)

झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही.