नवली फाटक येथे उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ...

पालघर रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेस असलेल्या नवली रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पूर्वेकडील नागरिकांची आता वाहतूक कोंडीपासून आणि फाटक उघडण्यासाठी वाट पाहण्यापासून सुटका होणार आहे.

नवली फाटक येथे उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ...
Work on flyover at Navali Phatak begins...
नवली फाटक येथे उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ...

नवली फाटक येथे उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ...

      पालघर रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेस असलेल्या नवली रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पूर्वेकडील नागरिकांची आता वाहतूक कोंडीपासून आणि फाटक उघडण्यासाठी वाट पाहण्यापासून सुटका होणार आहे. या पुलाचा फायदा पालघर शहराच्या पूर्वेस असलेल्या वेवुर, नवली, वाकसई, कमारे तसेच मनोर परिसरातील गावांमधून येणाऱ्या नागरिकांना होणार आहे. या मार्गावर असलेल्या रेल्वे फटकाच्या दुरुस्तीचे काम घेतल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी चार ते पाच दिवस बंद केला जात असे. त्यामुळे पूर्वेकडील वस्ती असलेल्या गावांतील नागरिकांना, नोकरदारांना व विद्यार्थ्यांना पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठ, शाळा, बँका, दवाखाने, किराणा दुकाने व आदी जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यवसायांकडे जाण्यासाठी मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत असल्यामुळे नागरिक नेहमीच आपला संताप व्यक्त करीत होते. मात्र हे उड्डाणपुल नागरिकांच्या समस्येवर पर्याय ठारणारे आहे.

  पालघर शहराच्या पश्चिमेकडून वेवुर, नवली, कमारे व वाकसई पूर्व भागाकडे जाण्यासाठी या उड्डाणपुलाचा वापर होणार असून सुमारे ७० मीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवरील पुलाचा भाग रेल्वेकडून उभारण्यात येणार आहे. मात्र  या पुलाच्या उभारणीच्या जागेमध्ये गजानन अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्थेची २८ चौ. मी. क्षेत्रफळावर वसलेली इमारत बाधित होत असून २१ सदनिकांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र या सदनिकाधारकांना जमीन अधिग्रहण करताना दिला जाणारा मोबदला अल्प असल्याची तक्रार सदनिकाधारकांनी लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या सदनिकाधारकांना बाजारभावापेक्षा सुमारे २ हजार २०० रुपये कमी दर मिळत असल्याने त्यांना स्टेशनपासून पाच किलोमीटर परिसरात नवीन घर खरेदी करणे शक्य नसल्याने आम्हास पुरेसा मोबदला द्यावा अशी त्यांची मागणी आहे. देण्यात येणार मोबदला ६०० चौ. फुटाच्या सदनिकाधारकांना ४१ लाख तर ८५० चौ. फुटाच्या सदनिकाधारकांना ५६ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती इमारतीतील सदनिकाधारकांनी दिली.

      पालघर पोलीस वसाहतीकडून सुरू होणारा हा पुलाचा मार्ग पुढे नवली जिल्हा परिषद शाळेजवळ उतरणार असूूून या पुलाला जोडणाऱ्या दुपदरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. पुलाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू असून रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही मिनिटावर इमारत वसली असताना त्यापोटी मिळणाऱ्या मोबदल्यात पालघर शहरापासून चार ते पाच किलोमीटरवर इतक्याच क्षेत्रफळाची नवीन सदनिका विकत घेणे शक्‍य होणार नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या तक्रारी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आली असून दर निश्चिती ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र भूसंपादन होणाऱ्या जागेचा मोबदला देताना जमिनीचा दर तसेच उभ्या असलेल्या इमारतीच्या स्थितीवरून निश्चित केलेल्या समितीमार्फत करण्यात येत असून या इमारतीला सुमारे साडेदहा कोटी रुपये मोबदला देण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. सध्या इमारतीच्या सदनिकाधारकांना करार करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून दर वाढविण्या संदर्भात निर्णय भूसंपादन समितीमार्फत घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पूल उभारण्याचा तपशील

● रेल्वेचे उड्डाण पुलाची लांबी : ११४.०४ मीटर (दुपदरी)
● पोहोच रस्त्याची रुंदी : ७ मीटर (दुपदरी)
● व्हायाडक्ट : पूर्व बाजूस १२० मिटर व पश्चिम बाजूस २५६.३५ मीटर
● रिटेनिंग भिंत : पूर्व बाजूस १३० मीटर व पश्चिम बाजूस १७४.५० मीटर
● अंदाजित खर्च : १८.२६ कोटी रुपये
● कालावधी : १२ महिने

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

__________