पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही.

पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या
maharashtra government

पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या

Run the state from Pune or give a new Guardian Minister

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही. अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचले आहे. 

पुण्यात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना डिवचले आहे. अजितदादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. हे मंत्री 11 वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. अजितदादांवर कामाचा लोड आहे.

त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील. लोकांच्या समस्या अधिक वेगाने आणि लवकर सुटतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या काळात भाजप सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे. अडीचशे बेड्सचे विलगीकरण सेंटर तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. कुठल्याही चौकशीशिवाय कोणत्याही निष्कर्षावर जाणं योग्य नाही. चूक तांत्रिक आहे की मानवी आहे हे अहवाल आल्यावर कळेल.

पुण्यातील ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. सरकार म्हणून तुम्ही काय देत आहात हे सांगा, असं सांगतानाच सीरम इन्स्टिट्यूटने महाराष्ट्राला आधी प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी अजित पवारांना झोप कमी करा आणि पालकमंत्रीपद सोडा असा सल्ला दिला होता. त्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासा, अशी टीका अजितदादांनी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. 

किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.